माजी आमदाराच्या सहकाऱ्यावर हल्ला
By Admin | Published: August 20, 2016 02:05 AM2016-08-20T02:05:10+5:302016-08-20T02:05:10+5:30
कुर्ला विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या चालकानेच व्यवस्थापकावर चार गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी चेंबूर येथे घडली. नेहरूनगर
मुंबई : कुर्ला विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या चालकानेच व्यवस्थापकावर चार गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी चेंबूर येथे घडली. नेहरूनगर पोलिसांनी मंगेश वाघमारे (३८) याला अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी ४च्या सुमारास ही घटना घडली. चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनीलगत असलेल्या प्रगती सोसायटीजवळ नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. माजी आमदार मिलिंद कांबळे यांचेच हे बांधकाम आहे. शुक्रवारी दुपारी कांबळे हे त्यांच्या चालकासह तिथे आले होते. याच दरम्यान इमारतीचे काम पाहणारा व्यवस्थापक अनिल भिसे (४९) आणि आरोपी वाघमारे यांच्यात बाचाबाची झाली. अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. वाघमारेने रिव्हॉल्व्हरमधून भिसेवर चार गोळ्या झाडल्या. भिसे याच्या पाठीवर आणि खांद्यावर या लागल्या. याच दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
ही बाब माजी आमदार मिलिंद कांबळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ भिसे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आल्याचे झोन ६चे पोलीस उपायुक्त शहाजी उपम यांनी सांगितले. मात्र या भांडणाचे खरे कारण आद्याप समोर आले नसून दोघांच्या जबाबानंतरच ते पुढे येईल, अशी माहिती उमप यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
गाडीची चावी घेऊन पसार
जखमी भिसे यांना कांबळे आपल्या गाडीतून रुग्णालयात नेणार होते. मात्र आरोपीने चावी घेऊनच पोबारा केला. त्यामुळे चावी शोधण्यासाठी बराच वेळ जखमी भिसे यांना गाडीजवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर रिक्षात बसवून
भिसे यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.