मुंबई : भरधाव वेगाने निष्काळजीपणे गाडी चालवत वरळी सी लिंकच्या रेलिंगला जोरदार धडक देणाऱ्या माजी आमदार पुत्राविरोधात वरळी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. यात कोणीही जखमी झाले नसले तरी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. माजी आमदार पुत्राला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव तक्षिल असे असून तो भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा पुत्र आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास वरळी सी-लिंक दक्षिण वाहिनी येथे Lamborghini Huracan coupe my 15 या कारचा अपघात झाला. ही कार तक्षिल भरधाव वेगात तसेच निष्काळजीपणे चालवत होता. सी-लिंकवर पाऊस पडल्यामुळे रस्ताही ओला झाला होता. ज्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट जाऊन सी-लिंकच्या रेलिंगला आदळली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात गाडीचे बरेच नुकसान झाले असून तक्षिलचा उजवा हात भाजला आहे. या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ती गाडी पोलिसांनी त्वरित टोइंग करत पोलिस ठाण्यात नेली. यात अन्य कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम २७९ आणि ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.