मुंबई : सिटी को-ऑप. बँकेत झालेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवड्यात या प्रकरणाशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करत महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. त्याआधारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना समन्स बजावून पुन्हा ईडी चौकशीला बोलावण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
अडसूळ हे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांचे नातेवाईक संचालक मंडळावर होते. या बँकेची उलाढाल सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होती. कर्जवाटपात अनियमितता आणि एन.पी.ए.मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला जात बुडीत निघाली. खातेदार आणि ठेवीदारांनी अडसूळ यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र काहीच तोडगा न निघाल्यामुळे अखेर खातेदारांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पुढे याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केली आहे. यामध्ये ईडीने अडसूळ यांची ३ तास चौकशीही केली होती. पुन्हा गेेल्या आठवड्यापासून ईडी ॲक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना चौकशीला बोलावू शकते, अशी माहिती समोर येत आहे.