Join us

आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला; त्यांची खासदारकी रद्द करा, चंद्रकांत खैरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 4:39 PM

नारायण राणेंचा अधीश बंगला प्रकरणावर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सक्त आदेश दिले आहेत. नारायण राणेंचा अधीश बंगला हा बेकायदेशीर असून, या बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करण्यासाठी नारयण राणेंनी दुसऱ्यांदा केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असा निकाल हायकोर्टाने दिला आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैर आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नारायण राणे यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितल. 

"सत्तेच्या अहंकाराला न्यायव्यवस्थेपुढे..." राष्ट्रवादीचा नारायण राणेंना टोला

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना...माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना तुम्ही जितका त्रास द्याल, त्यांना आई जगदंबा कधीही माफ करणार नाही. ती नक्की बदला घेते आणि आई जगदंबेने नारायण राणेंचा चांगला बदला घेतल्याचं चंदकांत खैरे यांनी सांगितलं. 

दरम्यान, सदर निकाल देताना हायकोर्टाने नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातीब बांधकाम अनधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच या बंगल्यातील बांधकामाचा अनधिकृत भाग नियमित करण्यासाठी नारायण राणेंनी दुसऱ्यांदा केलेला अर्ज विचारात घेता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर पाडकामाची कारवाई करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याची सूचना कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला दिली आहे. दरम्यान, या अनधिकृत बांधकाम प्रकरणी हायकोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

टॅग्स :नारायण राणे चंद्रकांत खैरेभाजपाशिवसेना