लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:38 PM2022-10-07T23:38:15+5:302022-10-07T23:38:37+5:30

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावरुन नाराजी वर्तवली आहे.

Former MP Chhatrapati Sambhaji Raje has also expressed his displeasure with the current politics in Maharashtra. | लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

Next

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बीकेसीवरील मेळाव्यातून सडेतोड उत्तर दिलं. 'बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केली. या टीकेवरुन आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. 

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावरुन नाराजी वर्तवली आहे. लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये, कोणाच्या नातवापर्यंत जाऊ नये, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारणात टीका करताना अपशब्द वापरले जात असल्याची खंत देखील संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

 "एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय...", लेकावरील टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणं कमीपणाचं आहे. त्यांच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

खासदार श्रीकांत शिंदे यांचं पत्र- 

"एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?" असा सवाल ही विचारला आहे. तसेच उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो?" असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Former MP Chhatrapati Sambhaji Raje has also expressed his displeasure with the current politics in Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.