मुंबई - माजी खासदार मोहन रावले यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. काही कामानिमित्त गोवा येथे गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मोहन रावले यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. मोहन रावले यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेमधून केली होती. त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यानंतर १९९१ मध्ये ते मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ असे मिळून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. दरम्यान, २००९ मध्ये पुनर्रचित मतदारसंघात त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली, असे राऊत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.