"शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:52 AM2021-03-10T10:52:22+5:302021-03-10T10:52:29+5:30
माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई: नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही राहणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारवर मंगळवारी निशाणा साधला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावतेंनी शिवसेनेला देखील कानपिचक्या लगावल्या.
मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणे चुकीचं आहे, सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय, हा प्रकार हास्यास्पद आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही अशी खंत दिवाकर रावतेंनी विधान परिषदेत व्यक्त केली होती. तसेच मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ? अशी संतप्त भावना दिवाकर रावतेंनी बोलून दाखवली.
दिवाकर रावतेंच्या याच विधानावरुन भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात "आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार" असं बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त ३५ टक्के शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखदेखील राहणार नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे.
जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात "आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार" असं बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त ३५ टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 10, 2021
तत्पूर्वी, प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर राजभाषा असल्याने बंधनकारक आहे. परंतु आजही तसं होताना दिसत नाही. मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आजही तेच आहे बदललं जात नाही. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले जातात मराठी भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव अशा शब्दात दिवाकर रावतेंनी पक्षाला घरचा आहेर दिला होता.
औरंगाबादचं संभाजीनगर मुद्द्यावरूनही दिवाकर रावतेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं. संभाजीनगर बोलायचं नाही कारण हे किमान समान कार्यक्रमात नाही, मराठीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही हे मला बोलावं लागतंय. मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र तरीही मराठीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, असं टीकास्त्र दिवाकर रावतेंनी सोडलं होतं.