Join us

"आता अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली"; राणेंचा राजकीय भूकंपाचा इशारा

By मुकेश चव्हाण | Published: February 04, 2021 4:52 PM

अजित पवारांच्या या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.

मुंबई: राज्यातील दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर काँग्रेस हे पद शिवसेनेला देण्यास तयार आहे. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे, अशी राजकीय चर्चा रंगत आहे. मात्र काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावाबाबत रंगलेल्या चर्चेत काहीही तथ्य नाही, असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

अजित पवार म्हणाले की, अशा बातम्यात काहीही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. त्या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतोय. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचं कारण नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांच्या या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही, व ते कधी होणार नाहीत. पण  कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. मात्र आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असं निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे सांगितले. 

अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरही भाष्य केलं. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारबद्ल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. उलट केंद्रसरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रुपये लिटर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नये," असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी वीज दराबाबतही भाष्य केलं.

वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची ४५ हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. ३० हजार कोटी रुपये माफ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ठवीज कंपन्या अडचणीत असतानाही ३० हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या जनतेला राज्य सरकारने आधार दिला असल्याचं ते म्हणाले.

सेलिब्रिटींना ट्वीट करण्याचा अधिकार

"सेलिब्रेटींनी काय ट्विट् करावे हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला घटनेने स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार दिला आहे.त्याबद्दल आम्हाला टिप्पणी करण्याची गरज नाही. उलट एवढं आंदोलन पेटलेले असतानाही केंद्रसरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही दिले नाही," असा आरोपही अजित पवार यांनी केला. 

टॅग्स :अजित पवारकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपानिलेश राणे महाराष्ट्र सरकार