देवनार डम्पिंग ग्राउंडवरून अपप्रचाराचा कचरा; माजी खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:08 IST2025-04-24T06:07:59+5:302025-04-24T06:08:29+5:30

धारावीकरांना देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकणार” हा विरोधकांचा आरोप हास्यास्पद आहे. मुळात धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा मानस आहे.

Former MP Rahul Shewale alleges that Deonar dumping ground is dumping propaganda waste | देवनार डम्पिंग ग्राउंडवरून अपप्रचाराचा कचरा; माजी खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

देवनार डम्पिंग ग्राउंडवरून अपप्रचाराचा कचरा; माजी खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

मुंबई : आशियातील सर्वांत मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चर्चेत ठेवण्याचा विरोधकांनी विडाच उचलला आहे. हा प्रकल्प मार्गी लागतोय, हे वास्तव त्यांना  स्वीकारता येत नाही. अनेक दशके सत्तेत बसून त्यांना जे करता आले नाही, ते महायुती सरकारने केले. यामुळे विरोधक हताश, अस्वस्थ आहेत. म्हणूनच अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून देवनार क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड) विषयी तथ्यहीन आरोप करून धारावीकरांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. 

आधी हे लक्षात घेतले पाहिजे की धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देऊ केलेल्या देवनार डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर शासनाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचा मालकी हक्क राहणार आहे. एक इंच जागा विकासकाला किंवा अन्य संस्थेला देता येणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, जोवर शास्त्रोक्त पद्धतीने देवनार डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद केले जाणार नाही, तोवर तेथे कोणतेही बांधकाम करण्याचे नियोजन नाही.  

देवनार डम्पिंग ग्राउंड महापालिकेकडे आहे. डीआरपी/ एसआरए प्राधिकरणाचा या जागेवर कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. महत्त्वाचे म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी शासनाला देवनार डम्पिंग ग्राउंडची केवळ १२४ एकर जागा देण्यात येणार आहे. मात्र, भलतीच आकडेवारी जनतेला सांगून विरोधक संशय निर्माण करीत आहेत. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेच्या वतीने लावण्यात येईल. 

शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग ग्राउंड बंद केल्यावर पर्यावरण विभाग तपासणी करील.  सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणविषयक परवानग्या मिळाल्यावर या स्वच्छ रिक्त जागेचे हस्तांतरण शासनाकडे करण्यात येईल. यानंतर, बांधकामासाठी ही जागा योग्य आहे का, याची चाचपणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत तेथील पुनर्वसनाबाबत चर्चा करणे व्यर्थ आहे. 

“धारावीकरांना देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकणार” हा विरोधकांचा आरोप हास्यास्पद आहे. मुळात धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा मानस आहे. असे असताना त्यांना राहत्या घरातून काढून डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जोवर हे डम्पिंग ग्राउंड बंद करून ती जागा बांधकामासाठी सुरक्षित असल्याबाबत पर्यावरण विभागासह अन्य यंत्रणा भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोवर तेथे पुनर्वसनाचा विचारही करता येणार नाही. धारावीकरांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि सौंदर्यात भर घालणार, हे नक्की! या प्रकल्पामुळे केवळ धारावीच नव्हे तर मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. 
 

Web Title: Former MP Rahul Shewale alleges that Deonar dumping ground is dumping propaganda waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.