Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होणार आहे. याआधी राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी, महायुतीसह आता राज्यात तिसरी आघाडी झाली आहे. दरम्यान, या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज "चला शिवस्मारक शोधायला" हे आंदोलन छेडलं आहे. आज हे आंदोलन मुंबईतील गेट वे परिसरात आंदोलन सुरू आहे. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा ताफा पोलिसांनी अडवला आहे. कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ सुरू झाला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी माझे कार्यकर्ते आरोपी नाहीत, त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता खाली उतरवा असं सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांनी खाली उतरवले. यावेळी संभाजीराजे यांनी कारमधून भाषण केले. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
"तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यातही सरकार आहे. जलपूजन करुनही स्मारक का झालेलं नाही?, असा सवाल यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केला. या पुतळ्यासाठी माझी त्यावेळी देवेंद्र फडणवीस, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाविकास आघाडीतील सरकार काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मी याबाबत प्रश्न केला होता. यावेळी त्यांनी कोर्टाचं कारण दिलं होतं, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"सरदार पटेलांचा पुतळा झाला पण शिवरायांचा पुतळा झाला नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे, मग स्मारक का होत नाही?, असा सवालही संभाजीराजेंनी केला. माझी पोलिसांना विनंतीही आहे त्यांची काय आहे ते आम्हाला सांगावं. आता शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं काही चालणार नाही, जमत नसेल तर त्यांनी तसं सांगावं, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"पोलिसांची दडपशाही सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. शिवस्मारकासाठी समिती स्थापन केली होती. पण त्या समितीचं काय झालं, याबाबत संभाजीराजेंनी प्र्स उपस्थित केले. समिती स्थापन झाली पण पुढे काय झालं याची कुणालाच माहिती नाही. सरकारला विचारलं ते कोर्टात विषय सुरू असल्याचे सांगत आहेत, असंही ते म्हणाले.