राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवसेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरेच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 07:44 PM2019-10-04T19:44:40+5:302019-10-04T19:45:13+5:30
संजय दिना पाटील यांनी शिवेसनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपानंतर बंडखोरी अन् पक्षांतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेटवच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ईशान्य मुंबईतीलराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा फटका मानला जात आहे.
संजय दिना पाटील यांनी शिवेसनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. नियोजित वेळ ठरल्याप्रमाणे 5 वाजता त्यांना मातोश्रीवर पोहचायचे होते. मात्र, भाऊ नेहमीप्रमाणे उशीरा पोहचले आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवालयाकडे रवाना झाले. पर्यायी रश्मी ठाकरेंसोबत फोटो काढून त्यांनी घड्याळाची टीक टिक बंद केली. त्यानंतर प्रवेशासाठी ते शिवालय येथे पोहचले. शिवालय येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाटील यांनी भगवा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याने शरद पवारांसाठी हे धक्कादायक आहे. संजय दिना पाटील हे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील खासदार होते. ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. संजय दिना पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुलुंड, भाडुंप या भागात शिवसेनेला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांना मानखुर्द भागातूनही चांगलं मताधिक्य मिळालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील चेहरा म्हणून सचिन अहिर आणि संजय दिना पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र या दोन्ही नेत्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्याचा भाजपा-शिवसेनेचा प्रयत्न आहे का? याबाबतही चर्चा सुरु आहे. कारण नवी मुंबईतील एनसीपीचे मोठे नेते गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडून भाजपाकडे गेल्या आहेत. तसेच ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय कोणताही बडा नेता राष्ट्रवादीकडे नाही.
निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपात गेले आहेत. यामध्ये उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, चित्रा वाघ, संदीप नाईक, गणेश नाईक, वैभव पिचड, राहुल नार्वेकर अशा अनेक राष्ट्रवादी नेत्यांना शिवसेना-भाजपात पक्षात घेतलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.