Join us

आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:24 PM

माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे.

मुंबई- ऋतुजा लटके यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा स्वीकारून राजीनामा स्वीकारल्याचे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने आज मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. या आदेशांमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा, हायकोर्टाने मुंबई मनपाला दिले राजीनामा स्वीकारण्याचे आदेश

माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. तर अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आपण हातात मशाल घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे खैरे म्हणाले. मात्र एक गोष्टीचा राग येतो की, किती छळ करायचा. आम्हाला उमेदवार मिळूच नाही, यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

न्यायालयाचा निकाल आल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ऋतुजा लटके म्हणाल्या की,आज न्यायदेवतेकडून मला न्याय मिळाला. मी पतीचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. कोर्टाने उद्या सकाळी ११ वाजेपर्यत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत, हे पत्र मिळाल्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल करेन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवणार आहे. माझं चिन्ह नवीन असलं तरी माझी माणसं जुनी आहेत, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले आहे. 

हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ऋतुजा लटके यांचं मोठं विधान, म्हणाल्या...

दरम्यान, शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात अकाली निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. दरम्यान, या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र निवडणूक लढवण्यासाठी लटके यांनी दिलेला मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने स्वीकारला नव्हता. त्याविरोधात ऋतुजा लटके यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :चंद्रकांत खैरेउद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे