मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:05 AM2021-04-29T04:05:02+5:302021-04-29T04:05:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विभागीय मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विभागीय मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गायकवाड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, एक मानसपुत्र आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.
सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मोठी मजल मारली. त्यांनी धारावी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केले होते. ते काँग्रेसच्या तिकिटावर सर्वप्रथम १९८५ साली आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९० आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. १९९९ ते २००४ या कालावधीत गायकवाड यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
गायकवाड यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील या विजयाने एकनाथ गायकवाड यांचे नाव देशपातळीवर पोहोचले. ‘जायंट किलर’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करीत दुसऱ्यांदा खासदारकी पटकाविली होती. २०१४ साली मात्र मोदी लाटेत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.
एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे; तर, समाजकारण आणि राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक हरपल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. गायकवाड यांच्या निधनाने महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याशिवाय, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.
........................