मुंबई: खंडणी प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आलेले व गेल्या मे महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबई दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीर सिंग नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंग आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. त्यांच्याविरोधात अनेकदा समन्स बजावल्यानंतर मुंबईतील कोर्टाने गेल्या आठवड्यात त्यांना फरारी घोषित केले. त्यामुळे परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागली.
26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंगांनी कसाबचा मोबाईल लपवला-
मुंबई पोलिसांतील निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल फोन गायब/लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे. निवृत्त एसीपी शमशेर खान-पठाण यांनी मुंबईच्या सीपींना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. पठाण यांनी पत्रात लिहिले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.
गिरगाव चौपाटीच्या ज्या सिग्नलवर कसाबला पकडले होते, त्या ठिकाणी परमबीर सिंग आले होते आणि त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. पण, त्यांनी तो फोन तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता. या मोबाईलवरुन हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅंडलरशी संवाद साधत होते. त्याफोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू शकले असते. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटलं आहे.