मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; ईडीची कारवाई, फोन टॅपिंग प्रकरण भोवले  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:34 AM2022-07-20T05:34:25+5:302022-07-20T05:34:59+5:30

२००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील तीन संवेदनशील विभागांतील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग झाले होते.

former mumbai police commissioner sanjay pandey arrested ed action phone tapping case | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; ईडीची कारवाई, फोन टॅपिंग प्रकरण भोवले  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; ईडीची कारवाई, फोन टॅपिंग प्रकरण भोवले  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणात झालेल्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी रात्री अटक केली. मंगळवारी पांडे यांची ईडीने सुमारे सात तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. बुधवारी त्यांना ईडीच्या दिल्ली येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

२००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील तीन संवेदनशील विभागांतील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे काम पांडे यांच्या आयसेक कंपनीने केले होते, तसेच या कामाकरिता त्यांना साडेचार कोटी रुपये मिळाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. या प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात ईडीने पांडे यांचा मनी लॉड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत जबाब नोंदवत अटक केली आहे. याच प्रकरणामध्ये ईडीने गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांची कस्टडी घेतली होती. राष्ट्रीय शेअर बाजारात को-लोकेशन घोटाळा झाला त्यावेळी तेथील सायबर सिक्युरिटी ऑडिटचे काम पांडे यांच्या आयसेक कंपनीला मिळाले होते. त्यामधील आर्थिक व्यवहारांचीदेखील चौकशी ईडीने आता सुरू केल्याचे समजते.

पांडे आरोपी क्रमांक तीन

राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयने संजय पांडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासोबत आता पांडेंवरही गुन्हा दाखल झाला आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये पांडे आरोपी क्रमांक तीन आहेत.

पांडेंच्या कंपनीला मिळाले साडेबारा कोटी?

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सायबर सिक्युरिटी ऑडिटचे काम पांडे यांनी स्थापन केलेल्या आयसेक सोल्युशन्स कंपनीला मिळाले होते. मात्र, आयसेकने ते आणखी एका लहान कंपनीला दिले. या कामासाठी पांडे यांच्या कंपनीला १२ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाल्याचे समजते.

फोन टॅपिंगसाठी नंबर रामकृष्ण यांनीच दिले

राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तीन विभागांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक टॅपिंगसाठी स्वतः राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांनीच दिल्याची माहिती आता पुढे आली आहे. या संदर्भात सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांच्यावर नवा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: former mumbai police commissioner sanjay pandey arrested ed action phone tapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.