Pradeep Sharma ( Marathi News ) : मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना २००६ साली झालेल्या लखन भैय्या चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही चकमक बनावट असल्याचं सांगत कोर्टाने शर्मा यांना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईत ११ नोव्हेंबर २००६ रोजी वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांना चकमकीत ठार केलं होतं. मात्र नंतर ही चकमक बनावट असल्याचं विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत उघड झालं होतं. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तब्बल १३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता. वादग्रस्त ठरलेल्या शर्मा यांना २००८ साली निलंबितही करण्यात आलं. मात्र नंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यांची चकमक प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आल्यानंतर सुनावणी पार पडली आणि अखेर आज कोर्टाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेप सुनावली आहे.
प्रदीप शर्मा यांची वादग्रस्त कारकीर्द :
- महाराष्ट्र पोलीस दलात १९८३ला उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या प्रदीप शर्मा यांनी १९९०च्या दशकात १२३ एन्काऊंटर केले. त्यामुळे त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी बनली होती.
- नेहमी वादग्रस्त राहिल्याने त्याची खातेनिहाय चौकशी होऊन २००८मध्ये त्याला निलंबित केले होते.
- लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात २०१०मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती.
- २०१७मध्ये त्यांना पुन्हा खात्यात घेण्यात आले. त्यानंतर ठाण्याचे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
- २०१९मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला.
- अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.