लोकमत संसदीय पुरस्कार समारंभासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:50 AM2023-01-26T06:50:36+5:302023-01-26T06:50:54+5:30
‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांचा चौथा पुरस्कार वितरण सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या १४ मार्चला दिल्लीत होणार आहे.
नवी दिल्ली :
‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांचा चौथा पुरस्कार वितरण सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या १४ मार्चला दिल्लीत होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, वंदना चव्हाण, तेजस्वी सूर्या आणि भाजपच्या लॉकेट चॅटर्जी यांच्यासह संसदेच्या आठ सदस्यांची २०२२ या वर्षाच्या ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचीही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळाने एकमताने सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड केली. लोकमत पार्लमेंटरी अवाॅर्ड निवड समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आरएसपीचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, राज्यसभेचे माजी सरचिटणीस योगेंद्र नारायण, दि प्रिंटचे संस्थापक व एडिटर-इन-चीफ शेखर गुप्ता, टीव्ही९ भारतवर्षचे वृत्त संचालक हेमंत शर्मा, लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता उपस्थित होते. ज्युरी बोर्डाचे सदस्य असलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता रॉय आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी त्यांच्या व्यस्ततेमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, तर निवड समितीचे सदस्य असलेले बीजेडीचे खासदार भर्तुहरी मेहताब यांनी निवड प्रक्रियेतून स्वतःला वेगळे केले होते.
रामनाथ कोविंद यांनी केले कौतुक
‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये लोकशाही प्रक्रियेला मजबूत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याच्या या उपक्रमाचे रामनाथ कोविंद यांनी कौतुक केले.
सर्व खासदारांच्या कामगिरीचा केला अभ्यास
ज्युरी बोर्डाने विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व खासदारांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा अभ्यास केला. खासदार वर्षभर करत असलेली सकारात्मक कामे लक्षात घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी २०१७ साली लोकमत संसदीय पुरस्कारांची संकल्पना अस्तित्वात आली. त्यानुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये उत्कृष्ट खासदारांना माननीय उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही.
भारतीय लोकशाहीवर होणार चर्चा
येत्या १४ मार्चला होणाऱ्या लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे. ‘इंडियन डेमोक्रसी : हाऊ टू क्लोज मॅच्युरिटी’ या विषयावर विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत.
याआधी मनमोहन सिंग, अडवाणी आदी सन्मानित
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शरद पवार, मुलायम सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, जया बच्चन, सुप्रिया सुळे, निशिकांत दुबे, हेमा मालिनी, भारती पवार, सुष्मिता देव, मीनाक्षी लेखी, डॉ. रजनी पाटील यांना याआधी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
जीवनगौरव
मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
भर्तृहरी मेहताब, बिजू जनता दल
सर्वोत्कृष्ट संसदपटू
असदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएम
डेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काॅंग्रेस
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
लॉकेट चॅटर्जी, भाजप
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटू
तेजस्वी सूर्या, भाजप
प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी
आठ वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार
सर्वांत विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (४ लोकसभेतून आणि ४ राज्यसभेतून) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.