जेव्हा बराक ओबामा मुंबईच्या रस्त्यावर ११ मिनिटं वाहनात अडकून बसले; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:28 AM2022-01-12T09:28:16+5:302022-01-12T09:28:52+5:30
अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांबाबत घडलेली घटना
- खुशालचंद बाहेती
मुंबई : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी २० मिनिटे कारमध्ये अडकल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अनेकांना हे माहीत नसेल की, २०१० मध्ये जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्तीला मुंबईत एका पोलीस उपायुक्ताने ११ मिनिटे आपल्या कारमध्ये बसून राहण्यास भाग पाडले होते.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २०१० मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. ७ नोव्हेंबर २०१० रोजी राष्ट्राध्यक्ष ओबामा सेंट झेवियर्स कॅालेजला भेट देणार होते. ओबामांच्या जवळच्या घेऱ्यातील (इनर कॉर्डन) सुरक्षेसाठी यूएस सुरक्षा एजंटना नेमण्यात आले होते. मुंबई पोलिसांना आउटर कॉर्डन म्हणजे इतर सर्व क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला. ओबामांच्या भेटीच्या एक दिवस आधी अमेरिकन सुरक्षा एजंटांनी सेंट झेवियर्सच्या इमारतीत त्यांचे मेटल डिटेक्टर बसवले. याला बंदोबस्त प्रभारी मुंबई डीसीपी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी अमेरीकी सुरक्षा अधिकार्यांना ते काढून टाकण्यास लावले आणि त्याजागी मुंबई पोलिसांचे डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवले.
ओबामांच्या प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रसन्ना यांना सेंट झेवियर्स जवळील इमारतींच्या टॉवर्सवर अमेरिकन बंदूकधारी दिसले. ही तैनाती पूर्णपणे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारी होती आणि पूर्वनियोजित सुरक्षा रणनीतीच्या विरुद्ध होती. प्रसन्ना यांनी त्यांच्या या तैनातीवर आक्षेप घेतला आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले. याला नकार देताच प्रसन्ना यांनी त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखत अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिसर सोडण्यास सांगितले.
अमेरिकनांनीही प्रसन्ना यांच्यावर शस्त्रे रोखली. ही माहिती मिळताच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ सेंट झेवियर्सला धावले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ओबामा सेंट झेवियर्सला जाण्यासाठी वाहनात बसले होते; परंतु प्रसन्ना आणि दयाल यांनी ओबामांच्या वाहन ताफ्यास निघण्याची परवानगी दिली नाही. दयाल यांनी वरिष्ठ यूएस सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
अनिच्छेने; परंतु नियमावर बोट ठेवल्याने प्रसन्ना यांचे म्हणणे त्यांना मान्य करावे लागले. प्रसन्ना यांनी अक्षरशः क्यूआरटीच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी सोबत घेऊन सर्व अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना खाली उतरवले व नंतरच ओबामांच्या कन्वहॉयला निघण्याची परवानगी दिली. हे सर्व होईपर्यंत ओबामा ११ मिनिटे कारमध्येच बसून होते आणि यूएस सुरक्षा कर्मचारी हातात बंदूक आणि ट्रिगरवर बोटे ठेऊन कारभोवती सुरक्षा कडे करून उभे होते.
...तर चुकीचा संदेश गेला असता
- अमेरिकन लोकांनी त्यांचे कर्मचारी आउटर कॉर्डन सुरक्षेसाठी तैनात केले, तर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारत त्यांच्या देशात व्हीआयपीचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, असा संदेश जाईल. नियमानुसार बाह्य कॉर्डन सुरक्षा व्यवस्थापन राज्य पोलिसांची जबाबदारी आहे. हा होता मुंबई पोलीस आयुक्तांना के. एम. मल्लीकार्जुन यांनी दिलेला खुलासा.
- के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सध्या औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.