Join us

...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:45 PM

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. यानंतर मनसे आणि भाजपा युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू असं मत व्यक्त केलं आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मा. गो. वैद्य  एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की,  मनसेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. मनसे आणि भाजप यांच्या विचारांपेक्षाही ते त्या व्यक्तिंवर अवलंबून असल्याचे मा. गो वैद्या यांनी सांगितले. त्यामुळे मनसेला भाजपाची भूमिका स्वीकृत असेल आणि संघाची व्यापक हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल असं मत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केलं आहे. 

मनसेचे बाळा नांदगावकर यांनी कोणासोबत राजकीय समीकरणं होणार मला माहिती नसून भविष्यात कोणासोबत जायचं, न जायचं हा निर्णय राज ठाकरे घेतली असं सांगितले होते. तसेच राजकारणात कधीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो असं सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. 

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.

'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'

 ...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'

नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं

टॅग्स :राज ठाकरेमनसेभाजपामहाराष्ट्र सरकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघ