Join us

राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, नरेश म्हस्केंची पोस्ट

By मुकेश चव्हाण | Published: October 25, 2022 5:50 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- भाजपा, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसेप्रमुखराज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी श्रीकांत शिंदेंसोबत त्यांच्या पत्नी आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.

राज ठाकरेंसोबत आज भेट झाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकद्वारे शेअर केली आहे. नरेश म्हस्के यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ज्यांच्या नेतृत्वात भारतीय विद्यार्थी सेनेत आम्ही घडलो त्या राज ठाकरे यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. जानेवारी ९ मार्च २००६ रोजी त्यांनी शिवसेनासोडून मनसेची स्थापना केली त्यानंतर आज भेट झाली. जवळजवळ १७ वर्षांनी आज प्रत्यक्ष भेट झाली.

एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे व्यासंगी, दिलदार व्यक्तिमत्व राज ठाकरे यांचे आहे. आज अनेक वर्षांनी गप्पा झाल्या, तसेच शर्मिला वहिनी तसेच अमित ठाकरे यांच्याशीसुद्धा मोकळेपणाने गप्पा मारता आल्या. या भेटीमुळे राजकीय वातावरणाच्या पलीकडे छान संवाद घडून आला. खूप वर्ष प्रत्यक्ष संवाद नव्हता...पण आज त्यांच्याशी संवाद साधत असताना जुने दिवस आठवले. त्यांची भेट झाली की प्रेरणेची दिप मनात उजळून येतात. ही भेट निश्चितच स्मरणात राहील, यात शंका नाही, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. राजकारणाच्याही पलीकडे संस्कृती व आपुलकी असते. दिवाळी हा संस्कृती जपणारा सण. या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे मने जोडण्याचा सोहळा. आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सपत्निक सदिच्छा भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मनसेसोबतच्या युतीवर सर्वेक्षण सुरु-

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मात द्यायची तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोबत असावी असे मानणारे भाजपमध्ये काही नेते आहेत. दुसरीकडे राज यांना सोबत घेऊन अधिक फायदा होईल की ते विरोधात लढले तर अधिक फायदा होईल याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे काही नेत्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे वेगळी लढल्यास होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल की शिवसेनेच्या याचाही अभ्यास केला जात आहे.

टॅग्स :राज ठाकरेठाणेमनसेशिवसेना