Join us

माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 8:36 PM

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अब की बार, ४०० पारचा नारा दिला आहे.

मुंबई - भाजपाने पक्ष बळकटी आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. तर, बड्या पक्षांनाही सोबत घेऊन महायुती मजबुत करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपाने पक्षात घेतले. त्यानंतर, त्यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली असून अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस नेत्यांना भाजपात आणण्यात येत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा येथील नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला. आता, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या सुनेलाही भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अब की बार, ४०० पारचा नारा दिला आहे. तर, महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागांवर उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. त्यामुळेच, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी भाजपाकडून सध्या बेरजेचं राजकारण सुरू आहे. अनेकांची नाराजी पत्करत भाजपाकडून काँग्रेस व इतर पक्षातील नेत्यांना भाजपात संधी दिली जात आहे. 

काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर ह्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यानंतर आता अर्चना पाटील याही मराठवाड्यातून भाजपला ताकद देण्यासाठी पुढे येत असल्याचे समजते. कारण, बसवराज पाटील मुरुमकर हे शिवराज पाटील चाकुरकरांचे मानसपुत्र मानले जात. मात्र, त्यांनीच काँग्रेसचा हात झटकून भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे, अर्चना पाटीलही लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा लातूर जिल्ह्यात आहे. 

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मराठवाड्यातील लातूर भागात केवळ देशमुख कुटुंबीयांचंच काँग्रेसमध्ये वर्चस्व अबाधित राहिलं आहे. त्यातच, चाकुरकर कुटुंबीयांचा नेहमीच चव्हाण कुटुंबीयांशी सलोखा राहिला आहे. त्यामुळे, आता अर्चना पाटील यांना भाजपात घेण्यासाठी चव्हाण आणि पाटील यांचे जोमाने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. तर, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. 

टॅग्स :लातूरकाँग्रेसभाजपाशिवराज पाटील चाकूरकरअशोक चव्हाण