लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विद्यार्थिप्रिय शिक्षिका, प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक व दुग्धपेढी संकल्पनेच्या प्रणेत्या अशी विविधांगी ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा इन्व्हेस्टमेंट बँकर अजित देशमुख आणि मुलगी केईएमच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले तसेच नातवंडे असा परिवार आहे. डॉ. देशमुख यांच्या पार्थिवावर सहार येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. स्नेहलता देशमुख यांनी बालरोग शल्यविशारद म्हणून ख्याती मिळवली. ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहणारी आहे. सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठाता म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. १९९५ ते २००० या कालावधीत विद्यापीठाच्या कुलगुरू असताना विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर आई-वडील दोघांचेही नाव असावे हा निर्णय त्यांनीच घेतला होता.