भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:45 AM2019-09-10T02:45:03+5:302019-09-10T06:30:01+5:30

युतीच्या फॉर्म्युल्याबाबतचे चित्र साधारणत: एक आठवड्यात स्पष्ट होईल

Formula 160-120 seats by BJP; The Shiv Sena demand 140 Seats, Fadanvis, Uddhav thackrey will going to Delhi | भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम

भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम

googlenewsNext

यदु जोशी 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेला वेग आला असून आम्हाला १६०, शिवसेना १२० आणि लहान मित्रपक्ष आठ असा फॉर्म्युला भाजपकडून देण्यात आला असून शिवसेनेने तो फेटाळला आणि दोघांनी प्रत्येकी १४० जागा लढाव्यात असा आग्रह धरला असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्याशी त्यांच्या मंत्रालयातील दालनात बंदद्वार चर्चा केली. भाजपने १६०-१२० आणि लहान मित्र पक्ष ८ असा फॉर्म्युला या चर्चेत दिल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर पाटील व महाजन यांनी चर्चेबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. दुसरीकडे भाजप-शिवसेनेने प्रत्येकी १४० जागा लढवाव्यात आणि ८ जागा लहान मित्रपक्षांना द्याव्यात असा फॉर्म्युला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला, असे समजते.

चंद्रकांत पाटील यांनी रात्री पत्रकारांना सांगितले की, युतीच्या फॉर्म्युल्याबाबतचे चित्र साधारणत: एक आठवड्यात स्पष्ट होईल. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील किंवा मग मुंबईत बैठक होऊन निर्णय होईल.

मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जवळपास आठ तास भाजपच्या प्रदेश कार्यालयात होते. भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री व सहनिवडणूक प्रभारी केशवप्रसाद मौर्य यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींशी निवडणूक रणनीतीबाबत चर्चा केली. भाजपने ३४ जिल्ह्यांमध्ये ३४ निरीक्षक पाठवून त्यांच्याकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन संभाव्य नावे मागविलेली होती. ती नावे या निरीक्षकांनी पक्षप्रभारी आणि मुख्यमंत्र्यांसमोर सादर केली. सर्व २८८ जागांवरील नावे भाजपने मागविली. युतीमध्ये जे मतदारसंघ भाजपला सुटतील तेथे उमेदवारीबाबत निर्णय घेणे सोपे व्हावे म्हणून सर्व ठिकाणची नावे आम्ही मागविली. ती नावे मागविण्यामागे स्वबळावर लढण्याचा उद्देश नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

लहान मित्रपक्षांना ८ जागा देणार
रिपाइं, रासप, शिवसंग्राम अशा लहान मित्रपक्षांना एकूण आठ जागा देण्याबाबत भाजप-शिवसेनेचे एकमत झाल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्या बाबतचे स्पष्ट संकेत मिळाल्याने लहान मित्रपक्षांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

 

Web Title: Formula 160-120 seats by BJP; The Shiv Sena demand 140 Seats, Fadanvis, Uddhav thackrey will going to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.