Join us

मालाडमध्ये चाळीचा, तर फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला; ७ ठार, ३८ जणांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:58 AM

मालाड-मालवणी येथील प्लॉट नंबर ८ बी वरील तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळला.

मुंबई : मुसळधार पावसामुळे गुरुवारी मालाडमध्ये चाळीचा तर फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला. मालाडच्या दुर्घटनेत दोन तर फोर्टमधील दुर्घटनेत पाच असा  सात जणांचा यात मृत्यू झाला.मालाड-मालवणी येथील प्लॉट नंबर ८ बी वरील तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. एकूण १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र दोघांना जीव गमवावा लागला. फैजल वहिद सय्यद (१८) आणि अंजुन शहाबुद्दीन शेख (२३) अशी मृतांची नावे आहेत.फोर्ट येथील लकी हाउसलगतच्या भानुशाली या तळमजला अधिक पाच मजली उपकरप्राप्त (सेस) इमारतीच्या एका बाजूचा भाग गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कोसळला. यात पाच जणांचा मृत्यू झाला. जोखना मोवालाल गुप्ता (७०), कुसुम गुप्ता (४५) आणि पडुलाल गुप्ता अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर मृत महिलांची नावे समजू शकली नाहीत. जखमी झालेल्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत १८ इमारती अतिधोकादायकम्हाडाने पावसाळीपूर्व सर्वेक्षण केले होते. त्यानुसार मुंबई शहरात १८ इमारती अतिधोकादायक असल्याचे म्हणत त्यांची यादीजाहीर केली होती. या अतिधोकादायक १८ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ इमारतींचाही समावेश आहे. म्हाडाकडून प्राप्त माहितीनुसार, अतिधोकादायक इमारतींमध्ये ३१७ निवासी व २२३ अनिवासी असे एकूण ५४० रहिवासी आहेत. १२१ निवासी रहिवाशांनी त्यांची स्वत:ची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित रहिवाशांना सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :मुंबई