मुंबई - दिवाळी म्हटलं की फटाके आले, नव्याने खरेदी आली, चिमुकल्यांच्या शाळांना सुट्टी आली अन् सुट्टीत किल्ला बांधणी आली. दिवाळीच्या सणात गावापासून शहरापर्यंत किल्ले बांधण्याची प्रथाच रुजू झाली आहे. आपल्या घरामोर मातीचा किल्ला बांधून काव म्हणजे तपकिरी रंगाने तो सजविण्यात जी मजा असते ती औरच. कुणी प्रतापगडाची प्रतिकृती तयार करते, तर कुणी रायगड बांधण्याचा प्रयत्न करते. लहानपणीच्या या आठवणी मोठेपणीही प्रकर्षाने जाणवत असतात. म्हणूनच आमदार आणि राजकीय फटाके फोडणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही बालगोपालांसोबत किल्ले बांधणीत हात चालवताना दिसून आले. शिवसेनेचा, मातोश्रीचा किल्ला ते मजबूतपणे बांधताना दिसत आहेत.
दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांमधील निर्मित्ती कलेला वाव देण्यासाठी आणि ऐतिहासिक परंपर जपण्यासाठी ही स्पर्धा असते. यावेळी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांवर खेळण्यातील मावळे आणि शिवरायांचे सिंहासनही पाहायला मिळते. बालपणीची, शालेय जीवनातील सर्वात आनंददायी गोष्ट. म्हणूनच, आदित्य ठाकरेंनाही किल्ला पाहून किल्ले बांधणीत सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.
आदित्य ठाकरेंनी दिवाळीनिमित्त मातोश्री या निवासस्थानी मातीचा किल्ला उभारला. किल्ला बनवताना ते चिमुकल्यांसह रमलेले पहायला मिळाले. अत्यंत रेखीव असा किल्ला या सर्वांनी मिळून साकारला, आदित्य यांच्या हाती ब्रश दिसत असून ते मातीच्या किल्ल्या रंग देताना दिसून येतात. आदित्य यांना किल्ला बांधणीत सहभाग झाल्याचं पाहून अनेकांनी त्यांचा फोटो आणि व्हिडिओ काढला. त्यापैकी, एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
दरम्यान, सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटापुढे मोठं आव्हान उभं ठाकलं असून आदित्य ठाकरे मातोश्रीचा किल्ला समर्थपणे लढवत आहेत. बंडखोर शिवसेना नेत्यांवर गद्दार म्हणत हल्लाबोल करत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी काढलेल्या संवाद यात्रा चर्चेचा विषय ठरल्या असून विरोधकांवर ते चांगलेच बरसल्याचे दिसून आले. या किल्ले बांधणीचा त्यांचा फोटो पाहून आदित्य यांनी मातोश्रीचा किल्ला मजबूत असल्याचंच सूचवल्याचं काहींना वाटत आहे.