मुंबईतील किल्ले भग्नावस्थेत; संशोधन, संवर्धन आणि पुनर्प्रस्थापनास वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:10+5:302021-06-28T04:06:10+5:30
मुंबई : मुंबईतील काही किल्ले भग्नावस्थेत असून, सायन किल्ल्याचे काम निधीअभावी अर्धवट अवस्थेत थांबवावे लागले. दुसरीकडे शिवडी किल्ल्याच्या ...
मुंबई : मुंबईतील काही किल्ले भग्नावस्थेत असून, सायन किल्ल्याचे काम निधीअभावी अर्धवट अवस्थेत थांबवावे लागले. दुसरीकडे शिवडी किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरू आहेत, तर बेलापूर किल्ल्याच्या पुनर्स्थापनासाठी काहीही प्रयत्न केले गेले नसून ही वास्तू सिडकोच्या अखत्यारित येते. या किल्ल्यांवर संशोधन, संवर्धन आणि पुनर्प्रस्थापन करण्यास पुष्कळ वाव आहे. त्यांचे स्थापत्य निर्माण आणि परिसराचा विकास अधोरेखित व्हावा या दृष्टीने त्यांचे योजनाबद्ध पद्धतीने जतन करणे आणि काळजीपूर्वक संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी नोंदविले.
शासनाच्या राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालयाचे असिस्टंट आर्कियॉलॉजिस्ट डॉ. मयूर ठाकरे म्हणाले, किल्ले दगड-विटांच्या वास्तू नाहीत. ते आजच्या महानगराला त्याच्या इतिहासातील खऱ्या स्वरूपाशी जोडणारे दुवे आहेत. मुंबईवर त्या काळी होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायला ते खंबीरपणे उभे राहिले. आज कालपरत्वे नामशेष होत आहेत. आपल्या बहुसांस्कृतिक समाजाचे आणि इतिहासाचे ते एकमेव साक्षीदार आहेत. त्यांचे आयुष्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा आदर करून त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. संकुचित नागरी गरजा त्यांच्यावर थोपवणे बंद केले पाहिजे. आपण हा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचेल याची खात्री करणे गरजेचे आहे.
--------------------
मुंबईवर राजवटींचा अंमल
आत्ताची मुंबई पूर्वी सात बेटांचा समूह होते. ज्याला एकत्रितपणे बॉम्बे म्हटले जायचे. मराठे, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा विविध राजवटींचा मुंबईवर वेगवेगळ्या काळात अंमल होता. तेव्हाच्या बॉम्बेला शत्रूशी सामना करता यावा यासाठी चारही बाजूंनी किल्ल्यांनी संरक्षित केले गेले होते. आज किल्ले भग्नावस्थेत असले तरी ते अवशेष रूपाने आजही जिवंत आहेत.
--------------------
काळा किल्ला
धारावी येथे मिठी नदीच्या किनारी वसलेला रिवा किल्ला हा काळा किल्ला या नावाने ओळखला जात असून, रिवा किल्ल्यात एक भुयार आहे जे मिठी नदीचा प्रवाह अखंडित राहावा या दृष्टीने बांधण्यात आले होते. राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही वास्तू राज्य संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.
शिवडी किल्ला
राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेला हा शिवडी किल्ला ग्रेड वन हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदवण्यात आला आहे. मुंबई फोर्ट सर्किट प्रोजेक्ट अंतर्गत या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वागत करणारा दलदल प्रदेश या किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे हा किल्ला पक्षी निरीक्षणासाठी उत्तम मानला जातो.
--------------------
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्गत वसईच्या किल्ल्याची ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.
सायन किल्ल्याची ग्रेड १ हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदणी करण्यात आली. २००९ सालापासून या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य सुरू झाले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागांअंतर्गत अर्नाळा किल्ला ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.
घोडबंदर किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, रत्नागिरी आणि राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, शासन हाती घेणार आहे.
--------------------