मुंबईतील किल्ले भग्नावस्थेत; संशोधन, संवर्धनासह पुनर्प्रस्थापनेस वाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:20 AM2021-06-28T07:20:13+5:302021-06-28T07:20:22+5:30
किल्ले दगड-विटांच्या वास्तू नाहीत. ते आजच्या महानगराला त्याच्या इतिहासातील खऱ्या स्वरूपाशी जोडणारे दुवे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील काही किल्ले भग्नावस्थेत असून, सायन किल्ल्याचे काम निधीअभावी अर्धवट थांबवावे लागले. दुसरीकडे शिवडी किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरू आहेत, तर बेलापूर किल्ल्याच्या पुनर्स्थापनेसाठी काहीही प्रयत्न करण्यात आलेले नसून ही वास्तू सिडकोच्या अखत्यारित येते. या किल्ल्यांवर संशोधन, संवर्धन आणि पुनर्प्रस्थापनास वाव आहे. स्थापत्य निर्माण आणि परिसराचा विकास अधोरेखित व्हावा या दृष्टीने त्यांचे योजनाबद्ध पद्धतीने जतन करणे आणि काळजीपूर्वक संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.
शासनाच्या राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालयाचे असिस्टंट आर्कियॉलॉजिस्ट डॉ. मयूर ठाकरे म्हणाले, किल्ले दगड-विटांच्या वास्तू नाहीत. ते आजच्या महानगराला त्याच्या इतिहासातील खऱ्या स्वरूपाशी जोडणारे दुवे आहेत. बहुसांस्कृतिक समाजाचे आणि इतिहासाचे एकमेव साक्षीदार आहेत. मुंबईवर त्या काळी होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायला ते खंबीरपणे उभे राहिले. कालपरत्वे नामशेष होत आहेत. त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. हा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे, ही आपली जबाबदारी आहे.
मुंबईवर राजवटींचा अंमल
आताची मुंबई पूर्वी सात बेटांचा समूह होते. ज्याला एकत्रितपणे बॉम्बे म्हटले जायचे. मराठे, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा विविध राजवटींचा मुंबईवर वेगवेगळ्या काळात अंमल होता. तेव्हाच्या बॉम्बेला शत्रूशी सामना करता यावा यासाठी चारही बाजूंनी किल्ल्यांनी संरक्षित केले गेले होते. आज हेच किल्ले भग्नावस्थेत आहेत.
काळा किल्ला
nधारावी येथे मिठी नदीच्या किनारी वसलेला रिवा किल्ला हा काळा किल्ला या नावाने ओळखला जात असून, या किल्ल्यात एक भुयार आहे जे मिठी नदीचा प्रवाह अखंडित राहावा यासाठी बांधले होते. राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही वास्तू राज्य संरक्षित वास्तू म्हणून नोंदवण्यात आली आहे.
शिवडी किल्ला
राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेला हा शिवडी किल्ला ग्रेड वन हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदवण्यात आला आहे. मुंबई फोर्ट सर्किट प्रोजेक्टअंतर्गत या किल्ल्याच्या पुनर्स्थापनेचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वागत करणारा दलदल प्रदेश या किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे हा किल्ला पक्षी निरीक्षणासाठी उत्तम मानला जातो.
वसईचा किल्ला राष्ट्रीय संरक्षित वास्तू
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत वसईच्या किल्ल्याची ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.सायन किल्ल्याची ग्रेड १ हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदणी करण्यात आली. २००९ सालापासून या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य सुरू झाले.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागांअंतर्गत अर्नाळा किल्ला ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.घोडबंदर किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, रत्नागिरी आणि राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, शासन हाती घेणार आहे.