किल्ले सागरगड दुर्ग संवर्धन मोहीम
By admin | Published: June 24, 2016 03:54 AM2016-06-24T03:54:58+5:302016-06-24T03:54:58+5:30
सह्याद्री प्रतिष्ठानच्या उरण विभागातर्फे अलिबागच्या खंडाळे येथील सागरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानच्या उरण विभागातर्फे अलिबागच्या खंडाळे येथील सागरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत किल्ल्याच्या स्थानिक गावामध्ये किल्ल्याच्या इतिहासाची व दुर्ग संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे मुंबई संपर्क प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले की, २६ जून रोजी सकाळी ९ वाजता अलिबागमधील खंडाळे येथून मोहिमेला सुरुवात होईल. पुढे खंडाळे येथून ९.३० वाजता गड चढाईला सुरुवात होईल. दुचाकी किंवा चारचाकी घेऊन दुर्गप्रेमींना या मोहिमेत सामील होता येईल. सर्व दुर्गप्रेमींसाठी ही मोहीम नि:शुल्क आहे. मोहिमेमध्ये सामील होणारे सर्व दुर्गप्रेमी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत दिशादर्शक बाण लावण्यास मदत करतील. जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गडाची सफर करण्यास मदत होईल.
दरम्यान, गडावरील टाक्यांतील प्लॅस्टिकचा कचराही काढण्यात येईल. गडावर असलेला प्लॅस्टिक कचरा आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. सर्व स्वच्छता झाल्यानंतर गडाचे पूजन करून त्यावर भगवा ध्वज फडकवण्यात येईल. (प्रतिनिधी)