Join us

‘कुरियर’चा नंबर शोधला, बूट अन् दीड लाख गमावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 11:03 AM

भलत्याच क्रमांकावर संपर्क केल्याने विद्यार्थ्याची फसवणूक, जुहू पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुरियर मार्फत मागविलेल्या बुटाचे पार्सल न मिळाल्याने गुगलवर कुरियर कंपनीचा क्रमांक शोधत त्यांना संपर्क करणे एका विद्यार्थ्याला महागात पडले. त्याचे पार्सल आलेच नाही याउलट बँक खात्यातून जवळपास दीड लाख रुपये लंपास झाले. या प्रकरणी विलेपार्लेतील नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार हा २० वर्षीय तरुण असून त्याने एक बुटाची जोडी काही दिवसांपूर्वी कुरिअरमार्फत मागविली होती. त्याचे हे पार्सल पाच दिवसांपूर्वीच येणार होते. मात्र ते न आल्याने ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता विद्यार्थ्याने कुरिअरचा क्रमांक गुगलवर शोधला. 

तेव्हा त्याला ८२४०३४२३८४ हा क्रमांक मिळाला. विद्यार्थ्याने त्यावर कॉल केल्यावर तुमचे पार्सल चार दिवसांपूर्वी आले होते, मात्र तुम्ही फोन उचलला नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने ते दिले नाही असे उत्तर कॉल उचलणाऱ्याने दिले. त्यावर आता बूट कसे मिळतील अशी विचारणा विद्यार्थ्याने केली. 

तेव्हा संबंधित व्यक्तीने त्याला पार्सलचा ट्रेकिंग नंबर विचारला. तो त्याने दिल्यावर त्यांचे ट्रेकिंग होल्ड झाले असून ते अनहोल्ड करावे लागेल त्यासाठी त्याने पाठविलेल्या लिंकवर पाच रुपये भरावे लागतील असे सांगितले. विद्यार्थ्याने त्याच्यावर विश्वास ठेवत ती लिंक क्लिक करत त्याचे नाव, मोबाइल क्रमांक त्यात भरून नेट बँकिंग मार्फत पाच रुपये भरले. हे पैसे अर्ध्या तासाने डेबिट होतील असे त्याला सांगत संध्याकाळी सात वाजता बुटाचे पार्सलही मिळेल असे आश्वासन दिले.

कार्ड ब्लॉक करून केली तक्रारअखेर विश्वास ठेवत विद्यार्थ्याने पार्सलची वाट पाहिली. मात्र त्याचे पार्सल न येता साडेसहाच्या सुमारास त्याच्या बँक खात्यामधून तीन व्यवहार होत एकूण १ लाख ५९ हजार ५०० रुपये डेबिट झाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आणि त्याने त्याची सर्व कार्ड ब्लॉक केली. त्यानंतर जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :गुन्हेगारी