लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-काँग्रेसचा स्थापना दिवस दि,२८ डिसेंबर रोजी आहे. संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसतर्फे हा दिवस मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. काँग्रेस पक्षाला १३७ वर्षांची परंपरा आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. यामुळे दि,२८ डिसेंबर या दिवसाचे काँग्रेसच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. मुंबई काँग्रेसतर्फे या वर्षी काँग्रेस स्थापना दिवस मुंबईतील चुनाभट्टी येथील सोमय्या मैदान येथे मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. यावेळेस मल्लिकार्जुन खर्गे यांचा भव्य सत्कार सुद्धा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे ( एआय सी सी) 'हाथ से हाथ जोडो' हे अभियान सुरु केले जाणार आहे. या अनोख्या अभियानाचा शुभारंभ काँग्रेस स्थापना दिवसाचे औचित्य साधून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष,आमदार भाई जगताप यांनी ही माहिती दिली.
काँग्रेस राष्ट्रीय स्थापना दिवस व "हाथ से हाथ जोडो अभियान" या आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी व रूपरेषा ठरविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये काँग्रेस स्थापना दिवस व "हाथ से हाथ जोडो अभियान" या दोन्ही कार्यक्रमाबाबत ठराव मंजूर करण्यात आले.
या बैठकीत भाई जगताप यांच्या समवेत कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिश बागुल, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सर्व सभासद, तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"