- मनोहर कुंभेजकरमुंबई - कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार करणे सर्वसामान्य गरीब नागरिकांना परवडत नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वांद्रे (पश्चिम) येथे उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयाची पायाभरणी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज झाली. तेरा मजली १७४ खाटांच्या स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयामुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी शिंदे सेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर, माजी नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह महापालिका वाँर्ड ऑफिसर विनायक विसपुते आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे, अशी संकल्पना स्थानिक आमदार मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महालिकेकडे मांडली होती. पालिकेने ही मागणी मान्य केली आहे.
१७४ खाटांच्या या सर्व सुविधांयुक्त कॅन्सर रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या रुग्णालयाचे बांधकाम आगामी ३६ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या इमारतीमध्ये तळघर १ ते ८ मजले रुग्णालय असेल आणि ९ व १० मजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असेल. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
रुग्णालयात केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोगाची काळजी घेणारे हे अद्ययावत रुग्णालय असेल. सुमारे १३ हजार चौरस मीटर पेक्षा जास्तच्या बांधकाम क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत १२ ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांसह पाच प्रयोगशाळा असणार आहेत. डायग्नोस्टिकमध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्सदेखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन असेल. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वसतिगृहासारखी सुविधा निर्माण केली जाणार आहे.