Join us

कौशल्य शिक्षणाचा पाया विज्ञान-तंत्रज्ञानासह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 7:06 AM

रविवार, २८ फेब्रुवारी रोजी देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात असतानाच केवळ या दिनी नव्हे तर वर्षभर विज्ञानाशी सांगड घालण्याचा निश्चय शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांनी केला.

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण, उद्याेग व इतर कामे ऑनलाइन झाली. आता यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पनाच तंत्र आणि नावीन्यतेशी निगडीत असल्याने यंदाच्या वर्षी कौशल्य शिक्षणाचा पाया विज्ञान-तंत्रज्ञानासह नावीन्याने उभारला जाणार आहे. तसा संकल्पच देशभरातील विज्ञान केंद्रांनी केला आहे.

रविवार, २८ फेब्रुवारी रोजी देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात असतानाच केवळ या दिनी नव्हे तर वर्षभर विज्ञानाशी सांगड घालण्याचा निश्चय शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांनी केला. विशेषत: विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांपर्यंत आणि घरोघरी विज्ञान पोहोचविणारी देशभरातील विज्ञान केंद्रे २०२१ या वर्षात नावीन्यतेवर भर देणार आहेत. मुळात यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना ‘फ्युचर ऑफ सायन्स, टेक्नोलॉजी, इनोव्हेशन : इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क’ अशी आहे. या संकल्पनेलाच केंद्रस्थानी ठेवून वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने वर्षभर कल्पकतेवर भर दिला जाणार आहे.

कोरोनामुळे यंदाचे सर्व उपक्रम ऑनलाइन होतील. कारण अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यानुसार नियोजन केले जात आहे. सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षण, कौशल्य यात विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे वापरता येईल, त्याचा एकमेकांवर कसा प्रभाव होत आहे? याबाबत निरिक्षण केले जाईल. 

उपक्रमाच्या माध्यमांतून फ्युचर ऑफ सायन्स, टेक्नोलॉजी, इनोव्हेशन : इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क यावर भर देणार आहोत. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी आपणाला याची मदत होईल.- शिवप्रसाद खेणेद, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी

समाज आणि देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी काम केले जात आहे. सायन्स, टेक्नोलॉजीशिवाय हे अशक्य आहे. यात आता इनोव्हेशनचीही भर पडली आहे.- उमेश कुमार रुस्तगी,  क्युरेटर - एफ, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी