पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाची स्थापना
By admin | Published: April 14, 2015 01:21 AM2015-04-14T01:21:47+5:302015-04-14T01:21:47+5:30
मुंबई, नागपूरनंतर आता राज्यातील पुणे शहर व परिसरासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई, नागपूरनंतर आता राज्यातील पुणे शहर व परिसरासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुणे महानगर विकास क्षेत्र हे पुणे जिल्ह्यातील मावळ व पुणे शहर तालुक्यांचे पूर्ण क्षेत्र तसेच हवेली, भोर, दौंड, शिरुर, मुळशी, खेड तालुक्यातील काही भाग मिळून होईल. त्याचे कार्यालय ंिपंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे.
गेली काही वर्षे बोकाळलेली अनधिकृत बांधकामे, बिल्डरांची मनमानी, त्यातून उद्भवलेले संघर्ष या सर्व बाबींवर नियंत्रण आणण्याचे आणि नियोजनबद्ध विकास करण्याचे काम आता प्राधिकरणामार्फत होईल. पुण्याचे पालकमंत्री हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील. पुणे जि.प.चे अध्यक्ष, पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापौर, मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरुर, मुळशी, खेड या पंचायत समित्यांचे सभापती पदसिद्ध सदस्य असतील. तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदीचे नगराध्यक्ष, पुणे व पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे सीईओ, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, तळेगाव, लोणावळा, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेही पदसिद्ध सदस्य असतील. नगररचना सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. (विशेष प्रतिनिधी)