मुंबई - महाराष्ट्र सायबर विभागाने सहा वर्षांत साडेचार लाखांहून अधिकच्या तक्रारींत आतापर्यंत साडेसहाशे कोटी रुपये वाचवले आहेत. तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० जणांचे जीव वाचवल्याचे सायबर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितले. यामध्ये सायबर हेल्पलाईन १९३० बरोबर १९४५ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सायबर हेल्पलाइनवर १५ ऑक्टोबर २०२४ पासून ९ लाखांहून अधिक कॉल आले आहेत. ज्याचा प्रतिसाद दर १०० टक्के असल्याचे सायबर विभागाचे म्हणणे आहे. तर २०१९ पासून महाराष्ट्र सायबरने ४.५ लाखांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये नागरिकांच्या कष्टाची ६५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवली आहे. यामध्ये एनसीसीआरपी पोर्टलवरून १६६ कोटी तर हेल्पलाइनमुळे ४६४.६१ कोटी २०२१ ते मार्च २०२५ दरम्यान वाचवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोल्डन अवर्स १५ मिनिटांवरफसवणुकीची रक्कम मिळवण्यासाठी पूर्वी तासाभराच्या आत कॉल केल्यास पैसे परत मिळत होते. मात्र, सायबर भामट्यांनीही पैसे काढण्याचा तसेच क्रिप्टोसह अन्य मार्गाने गुंतवण्याचा वेग वाढवला. त्यामुळे आता गोल्डन अवर्स १५ मिनिटांवर आला आहे.
ॲपमुळे मिळणार अलर्टसायबर पोलिस लवकरच त्यांची ॲप सेवा सुरू करणार आहेत. या ॲपद्वारे त्यांना एखादी लिंक सुरक्षित आहे की नाही, हे समजणार आहे. त्यामुळे हे ॲपदेखील सायबर गुन्हे रोखण्यास महत्त्वाचे ठरणार असल्याची आशा सायबर पोलिसांनी वर्तवली.
घिबली पडू शकतो महागात गेल्या काही दिवसांत घिबली इमेजची वाढती क्रेझ पाहता सायबर भामट्यांनीही फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला दिसत आहे. त्यामुळे या इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासह ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरुद्ध सायबर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तिकीट विक्रीसाठी नियम‘कोल्ड प्ले’सारख्या मोठ्या कार्यक्रमांच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा देणाऱ्या संकेतस्थळांसाठी महाराष्ट्र सायबरने एक श्वेतपत्रिका जारी केली. राज्य सायबरने या संकेतस्थळांना त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममधील त्रुटी दूर करण्यास सांगून गाइडलाइन जारी केल्या आहेत.