अभ्यासक्रम आराखड्यासाठी राज्यातून साडेचार हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:04+5:302021-09-23T04:08:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा ...

Four and a half thousand applications from the state for the curriculum | अभ्यासक्रम आराखड्यासाठी राज्यातून साडेचार हजार अर्ज

अभ्यासक्रम आराखड्यासाठी राज्यातून साडेचार हजार अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध विषयांवरील पोझिशन पेपर तयार करण्यात येणार आहेत. एससीईआरटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातून चार हजार ५०० अधिक तज्ज्ञ मंडळी, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, अशासकीय अधिकारी यांनी अर्ज केले आहेत. या अर्जातून निवड प्रक्रियेद्वारे तज्ज्ञांची निवड करून राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक एम. डी. सिंग यांनी दिली.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘एससीईआरटी’कडून शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा विकसित करण्यासोबतच २५ पोझिशन पेपर तयार करण्यात येणार आहेत. आराखड्याची निर्मिती प्रक्रिया सर्वसमावेशक आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहे.

त्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, मुख्याध्यापक व शिक्षक, सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य अशा सर्व समाजातील अनेक इच्छुक तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शालेय शिक्षण गटासाठी ७०५, बालपणातील काळजी व शिक्षण गटासाठी ३५६४, शिक्षक शिक्षण गटासाठी १७५३ तर प्रौढ शिक्षण गटासाठी ३१२ अर्ज राज्यभरातून आल्याची माहिती एससीईआरटीने दिली आहे.

दरम्यान, अर्ज इंग्रजीतच भरावा, अशी अट सुरुवातीला घालण्यात आली होती. त्यामुळे इच्छुक व्यक्तीला इंग्रजीचे ज्ञान नसल्यास, त्याने अर्ज कसा भरावा, अशी विचारणा अभ्यासकांनी केली. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या सूचना करायच्या झाल्यास, त्याने त्या कशा कराव्यात, असाही प्रश्न होता. त्यानंतर अर्ज भरण्याची सुविधा इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध करण्यात आली आणि मुदतवाढही देण्यात आली. मात्र, ही सुविधा सुरुवातीपासूनच उपलब्ध करण्यात आली असती तर अर्जसंख्या आणखी वाढली असती असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

चाैकट

पुण्यातील अर्ज सर्वाधिक

राज्यभरातून २५ पोझिशन पेपरसाठी आलेल्या चार हजार ५१४ अर्जांपैकी सर्वाधिक ६१८ अर्ज हे पुण्यातील आहेत. तर, सर्वांत कमी अर्ज गोंदिया जिल्ह्यातून आले असून अर्ज संख्या केवळ २२ आहे. मुंबईतून ३६७ अर्ज आले असून, बीड व लातूरमधून प्रत्येकी २८७ व २४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिकमधून २५८ तर, ठाण्यातून १८८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Four and a half thousand applications from the state for the curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.