साडेचार हजार युनिट रक्त जमा
By admin | Published: July 2, 2014 01:13 AM2014-07-02T01:13:34+5:302014-07-02T01:13:34+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) डॉक्टर डेचे औचित्य साधून राज्यभरामध्ये सुमारे ५० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) डॉक्टर डेचे औचित्य साधून राज्यभरामध्ये सुमारे ५० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्यभरातून आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला असून सुमारे साडेचार हजार युनिट रक्त जमा झाले असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी दिली.
रक्तदान हेच श्रेष्ठदान हा विचार रुजावा, अनेकांनी रक्तदानासाठी पुढे यावे म्हणूनच डॉक्टर डेचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील काही भागांमध्ये शनिवार आणि रविवारी तसेच आजही रक्तदान शिबिरे झाली. उर्वरित ठिकाणी ९ जुलै रोजीदेखील शिबिरे घेण्यात येणार आहेत.
राज्यात तीन दिवसांत झालेल्या शिबिरांमध्ये मीरा रोड, भार्इंदर आणि डहाणू या तीन ठिकाणी मिळून सर्वाधिक म्हणजे ४११ युनिट रक्त जमा झाले आहे. तर मुंबईमध्ये आयएमएच्या हाजीअली सेंटरमध्ये झालेल्या शिबिरात १०० युनिट तर जुहू आणि मालाड मिळून २२८ युनिट रक्त जमा झाले आहे. चंद्रपूर येथे २०२, कराडमध्ये १२५, धुळे येथे १०९ तर भिवंडी येथे ८० युनिट रक्त जमा झाले आहे. आयएमएतर्फे देशभरामध्ये अशाच प्रकारे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. लेले यांनी सांगितले.