* गुन्हे शाखेचा शिताफीने तपास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणामुळे तरुणाची निर्घृणपणे हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तरुणासह त्याच्या तिघा साथीदारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष-५च्या पथकाला यश आले.
छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी घडलेल्या घटनेप्रकरणी सुरेंद्र मंडल (२३), शाहू सलरे (३०), त्याचा भाऊ शामकुमार (२३) व विजयकुमार (५०) यांना अटक केली आहे. हत्येनंतर ते बिहार व कर्नाटकात पळून गेले असताना वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर व त्यांच्या पथकाने मोठ्या कौशल्याने त्यांचा छडा लावला.
मजूर काम करणाऱ्या सुरेंद्रच्या पत्नीचे बिहारमध्ये गावी एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे गावात बदनामी होत असल्याने तो चिडून होता. गावातील मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचे त्याने ठरविले. तरुणाला कामासाठी मुंबईला ओशिवरा परिसरात बोलवून घेतले. तेथून १४ मे रोजी सीसीएसटी परिसरात नेऊन कामाच्या साईटवर नेले. चौघांनी त्याला लोखंडी सळी व दगडाने मारले. चाकूने भोसकून त्याची हत्या केली. मृतदेह तळमजल्यावरील एका पाण्याच्या बेरेलमध्ये टाकून तो मिळू नये, यासाठी बेरेमध्ये मीठ टाकले होते. त्याबद्दल बेपत्ता झाल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर चोघे विविध ठिकाणी फरारी झाले. अनोळखी मृतदेह मिळाल्यानंतर प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर यांनी त्याबदल कसलाही पुरावा नसताना त्याचा छडा लावला.