धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 05:44 IST2025-03-26T05:43:38+5:302025-03-26T05:44:09+5:30
पोलिसांकडून तपास सुरू

धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात धारावी पोलिसांनी ट्रक, टेम्पो चालकासह त्यांच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तसेच अनधिकृतपणे पार्किंगचे पैसे गोळा करणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस शिपाई महेंद्र वळवी (३८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास निसर्ग उद्यानाच्या बाजूला फुटपाथलगत पार्क असलेल्या टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
अन्य वाहनांचेही स्फोटात नुकसान
ट्रक क्रमांक एमएच ०४ एफ जे १३२० आणि टेम्पो क्रमांक एमएच ०१ सीक्यू ०२५२ व्या चालकाने ट्रकमध्ये ज्वलनशील पदार्थ गॅस भरलेला असतानाही वाहन विनापरवाना रस्त्याच्या कडेला डबल पार्किंगमध्ये उभे केले. तसेच रेशनिंगच्या धान्याने भरलेला ट्रकसहित अनेक वाहने अनधिकृतपणे या पार्किंगमध्ये उभे होते. त्यामुळे झालेल्या स्फोटात अन्य वाहनांचे नुकसान झाले.
हे आहेत आरोपी
पोलिसांनी ट्रक चालक बाबू पुजारी, गस सिलिंडर सप्लायर्स करणारे मालक निनाद केळकर (५०) आणि मॅनेजर नागेश नवले (२८), चालक सोनू चारमोहन, वेलू नाडार, रेशनिंग मालक अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता (५०) यांच्यासह अनधिकृत पार्किंगसाठी चालवण्याऱ्या तरबेज तारीक शेख (२४) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई
संबंधित पार्किंग विरुद्ध यापूर्वीही स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.