लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बांधकामाच्या कंत्राटावरून गुंड सुमित उर्फ पप्पू येरुणकर (४६) याची चुनाभट्टीत दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अवघ्या आठ तासांच्या आत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आशुतोष गावंड, सनील पाटील, नरेश पाटील, सागर सावंत अशी या चौघांची नावे आहेत. पाचवा आरोपी प्रभाकर पचिंद्रे याचा पोलिस शोध घेत आहेत.
एक बांधकाम कंत्राट सागर सावंत, सनील पाटील यांना दिल्यामुळे सुमितने आर्यन बिल्डरवर गोळीबार केला होता. याप्रकरणातून महिनाभरापूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. रविवारी हेच कंत्राट मिळवण्यासाठी तो विकासकाच्या कार्यालयात गेला होता.
घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ तपास पथकांनी शोध सुरू केला. अवघ्या आठ तासांत यातील चौकडीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
स्वतःची टोळी चालवायचा
सुमितविरोधात अजय ठाकूर यांच्या हत्येचा आरोप आहे. तो स्वतःची स्वतंत्र टोळी चालवत होता. चुनाभट्टीतील बांधकाम व्यावसायिक जिनेश जैन यांच्यावर गोळीबारप्रकरणी सुमितला साथीदारांसह अटक करण्यात आली होती. तो त्यातून निर्दोष सुटलाही होता. आरोपींच्या मटका व्यवसायातही सुमितला हफ्ता हवा होता, अशी माहितीही समोर येत आहे.