Join us

विलेपार्लेतील हत्येप्रकरणी चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 1:14 AM

मालमत्तेच्या वादातून मयुरी घोलम (४२) यांना त्यांच्या सख्ख्या भाच्यांनी ठार मारले.

मुंबई : मालमत्तेच्या वादातून मयुरी घोलम (४२) यांना त्यांच्या सख्ख्या भाच्यांनी ठार मारले. याप्रकरणी दोन मुलींसह चौघांना विलेपार्ले पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविण्यात आल्याचे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले. महेंद्र दत्ताराम गोरुले, संदीप महेंद्र गोरुले, सोनल महेंद्र गोरुले आणि इंदू दत्ताराम गोरुले अशी या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.यातील संदीप आणि महेंद्र यांनी घोलम यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला, तर उर्वरितांनी त्यांना काठी आणि हाताने मारहाण केली. त्यामुळे संदीप आणि महेंद्र हे दोघेही या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातमध्ये लपून बसलेल्या या चौघांच्या मुसक्या शुक्रवारी रात्री आवळत शनिवारी सकाळी चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली.‘आम्ही त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे’, अशी माहिती विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली.घोलम यांच्या जागेवरून असलेल्या वादातून त्यांना जीव गमवावा लागला. बुधवारी हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांचे मारेकरी घटनास्थळाहून फरार झाले होते. विलेपार्ले पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

टॅग्स :मुंबईअटक