दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:44 IST2025-01-11T10:42:41+5:302025-01-11T10:44:52+5:30

जुहूमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Four Bangladeshi nationals arrested in Juhu under the guidance of encounter specialist Daya Nayak | दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

Bangladeshi Arrested: देशभरात अवैध बांगलादेशींवर कारवाई सुरू आहे. तसेच गेल्या १५ दिवसांत मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द देवनार, चुनाभट्टी आणि घाटकोपर या मुस्लिमबहुल भागातून मुंबई पोलिसांनी ३६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. अशातच आता गुन्हे शाखेच्या युनिट नऊने जुहू परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी एक प्रश्न विचारताच हे बांगलादेशी पकडले गेले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बेकायदेशीर बांगलादेशींवर राज्य पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक कारवाई करत आहेत. गेल्या एका महिन्यात अशा २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे वर्षानुवर्षे मुंबई, महाराष्ट्रात राहत होते. त्यांच्याकडून बनावट आधार, रेशन कार्ड, भारतीय पासपोर्ट, बँक खाते, फोटोपास, पॅन कार्ड, विवाह प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीनुसार जुहूमध्ये गुन्हे शाखेने बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये एक महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. काही बांगलादेशी नागरिक जुहू परिसरात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजन करून तातडीने कारवाई सुरू केली.

बुधवारी पोलिसांनी जुहू परिसरात सापळा रचून बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सर्व आवश्यक नियमांचे पालन करून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. यावेळी आरोपींनी आपण भारताचे नागरिक असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा दावा हा खोटा असल्याने पोलिसांनी काही मिनिटांमध्ये सिद्ध केलं. पोलिसांनी सर्वांना राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. आरोपींना राष्ट्रगीत गाता येत नसताना पोलिसांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. चौकशी आणि तपासादरम्यान चौघांकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अटक केलेल्या चार बांगलादेशींची ओळख पटली आहे. पोप्पी टिटू हुसैन (३० वर्षे, महिला), मोहम्मद तट्टू सोफिउद्दीन हुसैन (२५ वर्षे), नूर इस्लाम मकबूल (५५ वर्षे), फैसल बिकू मुल्ला शेख (३१ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांविरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
 

Web Title: Four Bangladeshi nationals arrested in Juhu under the guidance of encounter specialist Daya Nayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.