मुंबई शिक्षक मतदार संघात होणार चौरंगी लढत
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 5, 2024 18:25 IST2024-06-05T18:24:18+5:302024-06-05T18:25:00+5:30
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई शिक्षक मतदार संघात होणार चौरंगी लढत
मुंबई-शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी आज शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत येत्या दि,26 जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज कोकण भवन बेलापूर येथे दाखल केला. यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार कपिल पाटील , जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नीरज हातेकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, महाविद्यालयीन शिक्षकांच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, मधू परांजपे हे मान्यवर उपस्थित होते.
या मतदार संघातून उद्धव सेनेतून ज.मो.अभ्यंकर,भाजपा तून शिवनाथ दराडे,तर शिंदे सेनेतून शिवाजी शेंडगे आणि शिक्षक भारतीतून सुभाष मोरे यांनी निवडणूक अर्ज भरल्याने या मतदारसंघात चुरशीची चौरंगी लढत अपेक्षित आहे.
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पेन्शनच्या लढाईत यांनी सुभाष मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.ते चेंबूरच्या अमरनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून विविध शैक्षणिक व सामजिक आंदोलनात ते सहभागी असतात. शिक्षक भारतीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षकांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने त्यांची निवड झाली आहे.
माझी उमेदवारी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून कंत्राटिकरण आणि खाजगीकरण यांच्या विरोधात आहे. शाळा कॉलेज एडेड असो वा अन एडेड समान काम समान वेतन, समान पेन्शन आणि कॅशलेस आरोग्य योजना मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे मोरे यांनी सांगितले.