Join us

वकिलांच्या लसीकरणासाठी चार केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:05 AM

पालिका आयुक्तांकडून हिरवा कंदील; कुटुंबीयांसह क्लार्कनाही लाभलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वकिलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी चार केंद्रे देण्यात ...

पालिका आयुक्तांकडून हिरवा कंदील; कुटुंबीयांसह क्लार्कनाही लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वकिलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी चार केंद्रे देण्यात यावी, अशी मागणी बार कौन्सिलकडून पालिकेकडे करण्यात आली होती. याप्रकरणी पालिका आयुक्तांसाेबत झालेल्या बैठकीत त्यांनी हिरवा कंदील दाखवल्याने आता मुंबईत चार सेंटरमध्ये वकील, त्यांचे कुटुंबीय व क्लार्क यांनाही लस उपलब्ध करून देण्यात येईल.

पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत ३० मार्च, २०२१ रोजी मुख्य न्यायाधीशांची एक बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲड. गोवाचे सदस्य सुभाष घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत वकील, त्यांचे कुटुंबीय आणि कोर्टातील क्लार्क यांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही लस देण्यात येईल. त्यासाठी ४५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना बार कौन्सिलचे ओळखपत्र आणि आधारकार्ड घेऊन केंद्रावर जावे लागेल. तसेच काेविन पोर्टल, आरोग्य सेतू ॲपमार्फतही त्यांना ही लस घेता येईल. लॉकडाऊननंतर कोर्ट सुरू झाले तेव्हा अनेक वकिलांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्याची मागणी आम्ही केल्याचे घाटगे यांनी नमूद केले.

* अशी आहेत चार केंद्रे

मुंबई सेंट्रल येथील बी. वाय. एल. नायर रुग्णालय, वांद्रेचे बीकेसी जम्बो कोविड केंद्र, अंधेरीतील आर. एन. कूपर रुग्णालय तसेच घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय.