मुंबई : अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी परिसरात एकाच घरात राहणारी चार मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. याबाबत तक्रार कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांत केली असून, त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेपत्ता झालेली मुले ही ८, ११, १५ तसेच १८ वर्षांची असून, गुन्हे शाखा तसेच रेल्वे पोलीस त्यांचा समांतर शोध घेत आहेत.
दीनानाथ तिवारी (४३) या अकाउंटंटने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्यांची विवाहित बहीण आरती हिचे २०२२ मध्ये निमोनियामुळे निधन झाले. आरतीला तिचा पती पवन याच्यापासून आर्या (१८), अनुष्का (१५) भावेश (११) आणि कुमुद (८) अशी चार मुले आहेत. आरतीच्या निधनानंतर पवनने रीना हिच्याशी दुसरे लग्न केले.
१) दीनानाथ यांचा त्यांच्याशी फारसा संपर्क नव्हता. मात्र, २६ मे रोजी पवनने दीनानाथ यांची पत्नी जया यांना फोन करून त्यांची चार मुले पत्नी रीनासह घराबाहेर पडली; मात्र अद्याप परतली नाही, ती तुमच्याकडे आली आहेत का, अशी विचारणा केली.
२) तेव्हा जयाने मुले घरी आली नसल्याचे पवनला सांगितले. २७ मे रोजी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रारही करण्यात आली.
मुले राहिली ट्रेनमध्ये -
रीना ही त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परतली; पण तिच्यासोबत मुले नव्हती. ही बाब पवनने दीनानाथ यांना सांगितली. रीना मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याने त्यांनी तिच्याकडे मुलांबाबत चौकशी केली. तेव्हा तिने मुलांसह २६ मे रोजी कल्याणवरून पंजाब एक्स्प्रेस ट्रेन पकडली आणि २७ मे रोजी सकाळी ५ वाजता ती मध्य प्रदेश येथील खंडवा स्टेशन या ठिकाणी थांबली. रीना पिण्याचे पाणी भरण्यासाठी खाली उतरली मात्र तिला गाडीत चढण्यास वेळ लागल्यामुळे ट्रेन निघून गेली आणि मुले ट्रेनमध्येच राहिली. तिच्याकडे फोन नसल्याने तिने तेव्हा कोणालाही संपर्क केला नाही आणि घरी आल्यावर हा सगळा प्रकार कुटुंबाला सांगितला.