Join us

सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी; प्रवाशांना पूर्वकल्पना न दिल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:24 AM

काही प्रवाशांच्या मते या डब्यांमधून पोलिस उतरताना दिसल्याने हे डबे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचे जनरल डबे पोलिसांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. १५ डब्यांच्या ट्रेनमधील ९ डबे जनरल प्रवाशांसाठी असतात. परंतु, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता असे बदल करण्यात आल्यामुळे सणासुदीला कोकणातून परतणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसायला जागा मिळाली नाही. परिणामी गाडीमध्ये गर्दी होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांच्या मते या डब्यांमधून पोलिस उतरताना दिसल्याने हे डबे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

रविवारी सकाळी सावंतवाडीहून दिव्यासाठी निघालेल्या ८:२५च्या सिंधुदुर्ग एक्स्प्रेसला नेहमीप्रमाणे १५ कोच जोडण्यात आले होते. त्यामध्ये ९ कोच हे जनरल होते.  त्यामुळे अनारक्षित प्रवासी ही ट्रेन पकडण्यासाठी गेले असता त्यापैकी ४ जनरल कोच आरक्षित करण्यात आल्याचे प्लॅटफॉर्मवर अनाउन्समेंट करून त्यांना सांगण्यात आले. परिणामी दिवाळीची सुटी संपवून मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांना जागा मिळाली नाही. 

- हे कोच आरक्षित करण्यात आल्यामुळे त्या डब्यांमधील प्रवासी उर्वरित ५ जनरल कोचमध्ये बसविण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. सह परिवार असलेल्या काही प्रवाशांकडे तान्हे बाळे असल्याने त्यांचे हाल झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना याची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. ट्रेनमध्ये पोलिसांसाठी डबे आरक्षित करायचे असल्यास त्याबाबतचा पत्रव्यवहार पोलिस विभागाकडून करण्यात येतो. पोलिसांकडून अद्याप तरी मध्य रेल्वेकडे असा कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोंकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :सिंधुदुर्गरेल्वे