Join us

पायल तडवी आत्महत्येपूर्वी नायर रुग्णालयात रॅगिंगच्या चार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:11 AM

माहिती अधिकारातून उघड; रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई करत प्रकरणे काढली निकाली

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वीदेखील रुग्णालय प्रशासनाकडे चार रॅगिंगच्या तक्रारी दाखल् झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई करीत ही प्रकरणे निकालात काढल्याचे समोर आले आहे.आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडे मागितली होती. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या सर्व तक्रारी टोल फ्री क्रमांकावरून करण्यात आल्या होत्या.

नायर रुग्णालयातील अहवालानुसार २०१३ पासून रॅगिंगविरोधी समितीच्या २१ बैठका झाल्या. एका प्रकरणात समितीने केवळ एका विद्यार्थ्याशी निव्वळ चर्चा केली. तर रॅगिंग प्रकरणी समितीने आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे समितीचे म्हणणे आहे. रॅगिंगविरोधी समितीने गांभीर्याने चौकशी करून वेळीच कारवाई केली असती तर कदाचित डॉ. तडवी यांचा नाहक बळी गेला नसता, अशी भावना आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केली आहे.

पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची कारागृहात चौकशीनायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील सुसाइड नोटबाबत गुन्हे शाखेने भायखळा कारागृहात अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टर महिलांची चौकशी केली. त्यांच्याकडून विशेष अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र त्यांच्याकडे तपास सुरू आहे.

तडवी हिच्या मोबाइलमध्ये सुसाइड नोटचे छायाचित्र सापडल्यामुळे गूढ वाढले आहे. अटकेत असलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहर यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे.तडवीच्या आत्महत्येनंतर त्यांनी घटनास्थळावरून सुसाईड नोटचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप गुन्हे शाखेने केला. मात्र, मोबाइलमध्ये या चिठ्ठीचा फोटो दिसल्याने गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नेताजी भोपळे आणि पथकाने सोमवारी भायखळा कारागृहात जाऊन तिघींकडे चौकशी केली. सुमारे ५ ते ६ तास त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र तिघीही त्यांच्या उत्तरांवर ठाम असल्याने, येत्या काळात त्यांच्याकडे याबाबत अशाच प्रकारे चौकशी सुरू राहणार असल्याचे समजते.
त्या-त्या वेळी केलेतक्रारींचे निरसनमाहिती अधिकारात समोर आलेल्या तक्रारींची दखल रुग्णालय प्रशासन आणि रॅगिंगविरोधी कमिटीने घेतली असून त्यानुसार चौकशी व तपास सुरू आहे. रॅगिंगविषयी तक्रार झाल्यास त्याची संपूर्णत: चौकशी होईपर्यंत त्याची प्रक्रिया सुुरू असते. माहिती अधिकारात समोर आलेल्या काही तक्रारींच्या निरसनाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांना शिक्षा केली जाते.- डॉ. रमेश भारमल,अधिष्ठाता, नायर रुग्णालय