मुंबई : बेस्टच्या वीज बिल थकबाकीदारांसाठी बेस्ट प्रशासनाने अभय योजना आणली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळून तब्बल चार कोटी रुपयांची वसुली झाली. त्यामुळे या योजनेची मुदत आता आणखी सहा महिने वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी नफ्यात असलेला विद्युत पुरवठा विभाग तारक ठरत आला आहे. मात्र वीज चोरी आणि थकबाकीदारांचा फटका या विभागाच्या नफ्यावर परिणाम करीत असतो. बेस्ट उपक्रमामार्फत शहर विभागातील सुमारे १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यातयेतो. वाहतूक विभाग तोट्यात असतानाही बेस्ट उपक्रमाची गाडी सुरू ठेवण्याचे काम वीजपुरवठा विभाग करीत आहे. मात्र दक्षिण मुंबई भागात वीज चोरी व थकबाकीदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्राहकांना थकीत बिलाची रक्कम भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने फेब्रुवारी ते जुलै २०१८ या सहा महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत १०० टक्के थकबाकीवरील व्याज व विलंबित आकाराची माफी देण्यात आली होती. त्यामुळे या काळात बेस्ट उपक्रमाने तब्बल चार कोटी रुपये थकबाकी वसूल केली आहे.या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना आणखी काही काळ सुरू ठेवण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन बेस्ट प्रशासनाने आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत या योजनेची मुदत वाढवली आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी ही योजना निश्चितच दिलासा देणारी आहे, असे मत बेस्ट समिती सदस्य व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केले.
अभय योजनेतून झाली चार कोटींची ‘बेस्ट’ वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:04 AM