Join us

मुंबई उपनगर जिल्ह्यात चार कोटी ध्वजनिधी संकलित; राज्यपालांच्या हस्ते सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 2:47 AM

२०२० या वर्षासाठी ध्वजनिधी संकलन शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात नुकताच करण्यात आला.

मुंबई : २०१८-१९ या वर्षासाठी ध्वजनिधी संकलनात मुंबई उपनगर जिल्ह्याने ३.८२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ४ कोटी रुपयांचा निधी संकलित केला व १०४.४५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. या कामगिरीबाबत सरकारी-निम सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई उपनगर शिक्षण विभागामार्फत शाळकरी मुलांकडून २.५ कोटी रुपयांचे संकलन करण्यात आले.

२०२० या वर्षासाठी ध्वजनिधी संकलन शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात नुकताच करण्यात आला. या वेळी सुमारे २५ लाखांचा निधी उपस्थित संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांनी दिला. या वेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार पी., लष्कराच्या महाराष्ट्र, गोवा व गुजरातचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, मेरीटाइम एअर आॅपरेशनचे ग्रुप कॅप्टन एस.एम. बावले, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर (नि.) मिनल पाटील यांनी दिली. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना या वेळी गौरवण्यात आले.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी देशभरात ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील वर्षाच्या नोव्हेेंबर महिन्यापर्यंत निधी जमवला जातो.देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपला प्राण गमावला त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना या माध्यमातून राबवण्यात येतात. 

टॅग्स :मुंबई