पाळीव प्राण्यांचे खाद्य विक्रेत्याला चार कोटींचा चुना! आरोपी परदेशात पळण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:02 PM2023-08-01T14:02:13+5:302023-08-01T14:02:34+5:30
याप्रकरणी राजेश विसपुते या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : बोरिवली परिसरातील पाळीव प्राण्यांचे खाद्य तयार करून विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला चार कोटींचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी राजेश विसपुते या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार बबी शहा (२८) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विसपुतेने डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्याशी संपर्क साधत गुजरातमध्ये त्याची के. एम. इंटरप्रायजेस नावाची कंपनी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने शहा यांच्या कार्यालयात भेट दिली. मैत्री वाढवल्यावर शहा यांना त्यांच्या कंपनीची मालविक्री करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये शहा यांनी पहिली ऑर्डर विसपुतेला पाठवली. त्याचे बिलही ई-मेल आणि व्हाॅट्सॲपवर दिले. तसेच पुढेही विसपुते सांगेल त्याप्रमाणे दिल्ली, पुणे, गुजरात आणि इतर ठिकाणी हे खाद्य पोहचविण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विसपुते हा छोट्या-छोट्या ऑर्डर देत त्याचे थोडे थोडे पैसेही शहा यांना देत असल्याने त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला. पुढे त्याने मोठ्या रकमेची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचेही पूर्ण पैसे तो न देता त्यातील काहीच रक्कम शहा यांना द्यायचा.
धनादेश वटवू नका !
विसपुतेच्या कंपनीला एकूण ५६ बिले शहा यांनी पाठवली आहेत. ज्याची एकूण रक्कम १० कोटी १६ लाख ७१ हजार २१९ रुपये आहे.
यापैकी विसपुतेने अद्याप ६ कोटी २५ लाख २४ हजार ५०९ रुपये त्यांना दिले, तर २५ बिलांचे ३ कोटी ९१ लाख ४६ हजार ७१० रुपये थकबाकी असून, त्या पैशाची मागणी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देतो.
त्याच्या कार्यालयात गेल्यावर त्याची पत्नी आरडाओरडा करून धमक्या देते. बाकी रकमेचे धनादेश विसपुतेने दिले होते जे बाऊन्स झाले. कारण विसपुतेनेच बँकेला चेक न वटविण्याकरिता सांगितल्याचा शाह यांचा आरोप आहे.