मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लो-लाइन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तेथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही ते म्हणाले.
महापालिका सज्ज- आयुक्त इकबालसिंह चहल बैठकीत म्हणाले की, यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसविले आहेत. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहतील. - हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून, यात साचलेले पाणी वळते करून साठविण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अडचणी निर्माण झाल्यास धावून जाईल. प्रत्येक वाॅर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून, गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल.